...म्हणून मतदान करायचं. 26/11/2019




सत्ताकारण आणि राजकारण हे समानार्थी शब्द असण्याच्या काळात, सत्तापिपासू नेत्यांसाठी नैतिकता हा केवळ सोयीनुसार चघळायचा शब्द राहिला आहे. सत्तास्थापनेच्या या सगळ्या खेळाकडे हतबलतेने पाहणाऱ्या सामान्य जनतेला पडलेल्या एका प्रश्नाचा संविधान दिनी उहापोह करणे गरजेचं आहे.

मतदान का करायचं? हाच तो महाराष्ट्रातील तमाम जनतेला पडलेला उद्विग्नतेचा प्रश्न. त्यात एका बाजूला लोकशाही मूल्यांविषयी जनमानसात असणारी आस्था दिसून येते तर दुसऱ्या बाजूला लोकशाही व्यवस्थेवरील कमी होत चाललेला विश्वास सुद्धा दिसून येतो. यातील पहिला पैलू जितका सुखावणारा आहे तितकाच किंबहुना काकणभर अधिक दुखवणारा दुसरा पैलू आहे.

त्यातील दुसरा मुद्दा अधिक गंभीर असल्याने त्यावर चर्चा आवश्यक. आपले मायबाप असलेल्या केंद्र सरकारच्या अधीन राहून, कायदा न मोडता प्रघात मोडत, राज्यपालांनी कुणा एका विशिष्ट पक्षास मदत करणे हा भारतीय लोकशाहीसाठी नवखा प्रसंग नाही. ही परंपरा लोकशाहीच्या जन्मापासून आजतागायत चालतच आलेली आहे. आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सुद्धा भारतीय लोकशाहीच्या लवचिकतेचं प्रमाण मानायला हरकत नाही. राज्यपालांचे हे विशेषाधिकार, वेळ पडली तर कशा प्रकारे नियंत्रित केले जाऊ शकतात हे या निर्णयाने दाखवून दिलं.

लोकशाही नियमित उत्क्रांत होणारी प्रक्रिया आहे. आजपर्यंत घटनेत 102 वेळा दुरुस्ती झाली आहे हे देखील तेच दर्शविते. लोकशाही जेवढी कायद्याने मजबूत असायला हवी तेवढीच ती लोकांच्या मनात देखील रुजायला हवी. दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजांना विजय मिळवून देणाऱ्या विन्स्टन चर्चिलला, युद्धानंतर सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या जनतेमध्ये लोकशाही रुजली होती म्हणून ती तेवढी प्रगल्भ असेल. महाराष्ट्रात झाल्या प्रकाराने मतदारांमध्ये अगदी विश्वासघाताची साहजिक भावना आहे. परंतु लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करणं हे लोकशाहीच्या अनेक अंगांपैकी एक अंग आहे. दुर्दैवाने त्या अंगाला (डाव्या पक्षाचा ज्योति बसु यांना 1996 साली पंतप्रधान न करण्याचा दुर्मिळ निर्णय वगळता) स्वार्थाचा असाध्य रोग जडला आहे. म्हणून संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास कमी होऊ द्यायचे कारण नाही.

ज्या गांधीजींची 150वी जन्मजयंती सगळा देश साजरा करत आहे त्याच गांधीजींचं लोकशाही विषयी असणारं मत सांप्रतसमयी लक्षात घेण्यासारखं आहे - "संस्था जितकी मोठी तेवढाच तिचा गैरवापर होण्याच्या शक्यता अधिक असते; लोकशाही ही एक मोठी संस्था आहे म्हणूनच तिचा गैरवापर होण्याच्या शक्यता अधिक आहेत. पण म्हणून लोकशाही टाळणे हा त्यावरील उपाय नसून त्यावर होणाऱ्या किमान अत्याचाराची शक्यता कमी करणे हा उपाय आहे." तेव्हा मतदान का करायचं? या प्रश्नाचं कालातीत उत्तर एकच देता येईल, आणि ते म्हणजे लोकशाही अधिकाधिक मजबूत करण्यासाठी... 
सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माणसा मैदानात ये...!

सवाल अच्छे है!

सांगे पूर्वजांची कीर्ती...