(The beautiful evening view of Virupaksh Temple from Hemkuta Hills, Hampi)
लहानपणी आजीकडून ऐकलेल्या रामायण-कथांमधील हनुमानाचे जन्मस्थान - अंजनी पर्वत, सुग्रीव आणि रामाची भेट झालेली गुहा, माता शबरीची झोपडी आदी इत्यादी सर्व कुठे असेल? बालकथांमधे वाचलेले राजा कृष्णदेवराय आणि त्याचा चाणाक्ष सल्लागार तेनाली राम आणि दूरदर्शनवरील कार्टूनमध्ये पाहिलेलं त्यांचं विजयनगर साम्राज्य हे खरंच प्रत्यक्षात असेल का? आणि असेल तर ते कुठे असेल? पंडित भीमसेन जोशींच्या आवाजातील 'कानडा राजा पंढरीचा' गाणं लहानपणापासून ऐकत आलो होतोच पण जसजसं समजायला लागलं तसतसा पडलेला एक प्रश्न म्हणजे - पंढरपूरमधील आपला मराठी विठ्ठल 'कानडी' कसा काय असू शकतो? यांसारख्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली संघ लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मध्ययुगीन इतिहास वाचताना आणि ज्याक्षणी हे लक्षात आलं की या सर्वांची उत्तरं विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेल्या कर्नाटकातील 'हंपी'मध्ये सप्रमाण पाहायला मिळतील, त्याच क्षणी हंपी गाठायचं ठरलं!
कोरोनाकालीन दोन वर्ष आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी कोंडून राहिल्याने एखाद्या भटकंतीची गरज होतीच, ती या हंपी सफरीच्या निमित्ताने पूर्ण झाली. नोव्हेंबर ते मार्च हा हंपीमधील पर्यटक हंगाम. त्या पर्यटक हंगामाची गर्दी नसताना हंपी डोळे आणि मन भरून पाहता आलं. त्यातली ही काही निरीक्षणं...
भव्यता, सुबकता, सूक्ष्म तपशील आणि एकुणातच सुंदरता या शब्दांची मर्यादा दाखवून देणारं विजयनगरातील स्थापत्यशास्त्र ते पाहणाऱ्यास अगदी सहज रेंगाळून ठेवतं. या स्थापत्यशास्त्रातील पहिलेच उदाहरण म्हणजे हंपीचे लोकप्रिय विरुपाक्ष मंदिर. मुख्य मंदिरांसमोरची उंचच उंच गोपुरं हे द्राविडी स्थापत्यशास्त्राच्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक, तसंच ते विरुपाक्ष मंदिराचही वैशिष्ट्य. विशेष म्हणजे मुख्य गर्भगृहासमोर एवढं मोठं गोपुर असून सुद्धा उगवत्या सूर्याची किरणे काही निवडक दिवशी थेट गर्भगृहात पोहोचतील याची काजळी तत्कालीन अभियंत्यांनी घेतली होती. येणाऱ्या पर्यटकांना दिवसभर आपल्या भव्यतेने अवाक् करणारं हे मंदिर पर्यटकांना संध्यासमयी मात्र वेगळ्याच कारणांनी मंत्रमुग्ध करते. सूर्य मावळतीला आल्यावर हे विरुपाक्ष मंदिर नैसर्गिकरित्याच असे सोनसळी रंगात नाहून निघते की त्यास विशेष रोषणाईची गरजच नसते. हा सारा नजारा शेजारच्या हेमकूट टेकडीवरून अनुभवण्यासारखा असतो. मावळतीच्या प्रत्येक क्षणागणिक हा सारा परिसर कमालीची सुखद शांतता आणि रसिकता अनुभवतो. त्यात पार्श्वभूमीला सतत रमवणारे दाक्षिणात्य मंदिरांमधील वैशिष्ट्यपूर्ण असे मधुर संगीत उपस्थितांना भारावून टाकते. आलेला प्रत्येक जण ते क्षण स्मरणात साठवून ठेवावे की कॅमेरात कैद करावेत या विवंचनेत असावा असाच दिसतो.
सुंदरतेसोबतच प्रशस्तता हे मध्ययुगीन स्थापत्यशास्त्राचे आणखी एक चांगलं वैशिष्ट्य. हंपीतील कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी ही प्रशस्तता पाहायला मिळते. विशेषतः प्रत्येक मंदिरासमोर असणारी बाजाराची/व्यापारी ठिकाणं या प्रशस्ततेची साक्ष देतात. हत्तींसाठी बांधण्यात आलेले भव्य आणि प्रशस्त हत्तीखाणे आणि याशिवाय मुख्य कारभाराच्या सभामंडपाजवळ असणारी बारव (stepwell) सुद्धा प्रशस्तता आणि सममिती (symmetry) यांचं एक अनोखं मिश्रण आहे. कोणत्याही बाह्य उर्जेशिवाय केवळ सायफन पद्धतीने जवळपास 5 किमी अंतरावरच्या तळ्यातून जमिनीपासून 3 ते 4 फूट उंचीच्या कालव्यातून (canal) पाणी वाहून आणून ती बारव भरण्याची पद्धत आजही अचंबित करणारी आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रातील विविधता आणि कोणत्याही आडपडद्याशिवाय केलेलं त्यांचं सुनियोजन हे आजही आपल्याला क्वचितच पाहायला मिळतं. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उभारला गेलेला भव्य मंच, त्यावरील कोरीव मूर्त्यांमधून स्पष्ट होणाऱ्या विविध नृत्यकला, नाट्यकला यांमधून तत्कालीन मनोरंजनाच्या साधनांमधील वैविध्य पाहावयास मिळतं.
विजयनगरातील लोकं कशी दिसत असतील याचं कोणतंही प्रमाण उपलब्ध नाही पण बोरकरांच्या कवितेतील - 'देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, गोरटे वा सावळे त्यास मोल नाही फारसे ' या ओळींना प्रमाण मानल्यास आपले पूर्वज बरेच देखणे दिसत असावेत इतके ते कलापारंगत होते. केवळ कोरीव आकारांवरून विजय-विठ्ठल मंदिरातील वेगवेगळ्या खांबांमधून निघणारे वेगवेगळ्या वाद्यांचे सप्तसुर, कोरलेल्या पुरुष मूर्त्यांमधील शरीर-सौष्ठव तर स्त्री मूर्त्यांमधील गोलाई ही ग्रीकांच्या कलेशी मिळतीजुळती कला-वैशिष्ट्यंदेखील भारावून टाकणारी आहेत. हजार-राम मंदिराच्या भिंतीवरती शिल्प-मालिकांद्वारे कोरण्यात आलेली रामायण कथा आणि त्या प्रत्येक शिल्पातून कोरण्यात आलेली सूक्ष्म निरीक्षणे देखील पर्यटकांच्या कुतूहलाचा विषय. याशिवाय साधारणतः 14 व्या शतकात वनस्पतींपासून तयार करण्यात आलेल्या रंगापासून रंगवण्यात आलेली चित्रं आजही तितक्याच तजेलपणे उठावदार दिसतात, विशेषतः विरुपाक्ष मंदिरातील सभामंडपाच्या छतावर आतल्या बाजूने खालून पाहणाऱ्याला सरळ दिसतील अशी चितारलेली दशावताराची कथा शालेय वयात भीती घालणाऱ्या डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताशी मिळतीजुळती आहे. हंपीमध्ये अशा जातक बोधकथांची अगदी रेलचेल आहे.
दृश्य स्वरूपातील ही विविध शिल्पं पाहताना माझा वाटाड्या (guide) सतत त्यामागील तत्कालीन सामाजिक संदेशांची जाणीव करून देत होता. खास स्त्रियांसाठी तयार केले गेलेले हवा महाल, जलतरण तलाव हे स्त्रियांविषयीची संवेदनशीलता दाखवून देतात. काही ठिकाणी व्यापारी आणि खेळाडू स्त्रियांची शिल्पं तर काही ठिकाणी शिकारी स्त्रियांची शिल्पं ही सामाजिक सर्वसमावेशीपणा दाखवून देतात. समकालीन शिल्पांमध्ये काही स्त्रिया संपूर्ण पोशाखात तर काही स्त्रिया आखूड पोशाखात दिसून येतात यावरून त्या काळी स्त्रियांवरील अत्याचारांना त्यांचे आखूड पोशाख जबाबदार असावेत अशी मानण्याची बुरसटलेली विचारसरणी नसावी हे सुद्धा अधोरेखीत होते. काही शिल्पं पाहून एका 'रसिक' मित्राच्या एका प्रश्नाची आठवण झाली, म्हणून ती शिल्पं चित्रित केली आणि लगेच त्याला 'फॉरवर्ड' केली त्यावर त्याचा - "अरेच्चा, त्या काळच्या अगदी विवाहित स्त्रिया सुद्धा पुरुषांसोबतच 'बसत' होत्या की!" असा त्याचा संदेश मिळाला. एकुणातच काय तर बऱ्यापैकी सर्वच पातळ्यांवर आपले पूर्वज परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख समतोल सांभाळून होते, संस्कार वगैरे शब्दांचा उगाच अतिरेकी बागुलबुवा त्यावेळी नव्हता, स्त्री-दाक्षिण्यता एवढी लक्षणीय होती की त्यासाठी विशेष चळवळी वगैरे चालवण्याची गरजही नव्हती, हेही एक विशेषच!
पण एका बाजूला ही सर्व अचंबित करणारी रचना पाहत असताना मनातून मात्र वर्तमानाशी सतत तुलना होत होती. आपल्याकडे शहरांमध्ये किंबहुना आजकाल निमशहरांमध्ये सुद्धा कैक मजली उंच इमारती बांधल्या जात आहेत. भव्यतेच्या पातळीवर त्या मध्ययुगीन गोपुरांनाही फिक्या पाडतात पण प्रशस्तता, मोकळेपणा, आवश्यक अशा पुरेशा सूर्यकिरणांचा इमारतीमधील शिरकाव इत्यादी पातळ्यांवर आपण अयशस्वीच ठरतो आहोत. सायंकाळी बाग-बगीचांमध्ये सहज म्हणून फेरफटका मारायला जावं तर त्या वातावरणाची म्हणून जी असायला हवी अशी कसलीही शांतता किंवा रसिकता (नव जोडप्यांचा अपवाद वगळता!) अनुभवता येत नाही, आपल्या वाट्याला येते ती फक्त गर्दी आणि त्यातूनही उरली सुरली शांतता भंग करायला गाड्यांचे हॉर्न पुरेसे असतात. आपल्याकडे बऱ्याच मोठ्या खर्चाचे बरेच मोठाले प्रकल्प होत आहेत, ते आर्थिक आणि अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून निश्चितच कौतुकास पात्र आहेत पण त्याच वेळी त्यांच्या सुबकतेची काजळी आपणाकडून घेतली जाते का? या प्रश्नाचं उत्तर देखील नकारार्थीच. प्रशस्ततेच्या बाबतीत तर आपल्या बोळवणीला कुठला पारावारच उरला नाही. मग ते गावखेड्यातील छोट्याश्या जागेवर भरलेला भरगच्च बाजार असो की मग शहरांच्या पेठांमधील निमुळत्या होत जाणाऱ्या गल्ल्या असोत, सगळीकडे तीच बोंब.
मनोरंजनासाठीच्या नाट्यगृहांची अवस्था पाहावी तर त्यांचेही बारा वाजलेले आहेतच (बालगंधर्व सारखे काही अपवाद वगळता!). सामाजिक पातळीवर सुद्धा स्त्रीपुरुष समानता ही ओढून ताणून आणलेली नव्हती तर ती त्यांच्या सहज स्वभावातीलच एक गोष्ट होती. कलेच्या पातळीवर मात्र आपण कुठे कमी पडलो आहोत असे म्हणण्यास वाव नाही, पण मुळात ती कलाक्षेत्रीचीच महानता. सतत उत्क्रांत होत राहणे आणि नवनवीन कलाविष्कार घडवीत राहणे हाच मुळी कालक्षेत्रीचा स्थायीभाव, तेव्हा त्याही क्षेत्रात आपण समाज म्हणून काही भरीव केलं आहे असं नाहीच. लहानपणी रामायणातील कथांपासून सुरुवात करून ते तेनालीराम, अकबर-बिरबल, शेखचिल्ली अशा एक ना अनेक बोधकथांमधून लहानग्यांचे मनोरंजन आणि मूल्यवर्धनही होत होतं, पण पैसे कमावण्याची यंत्रे तयार करण्याच्या प्रयत्नात ही बोधकथांची एक चांगली मनोरंजन आणि शिक्षणपद्धती मागे पडलेली दिसते.
पूर्वजांकडून आपल्याला समृद्ध असा वारसा लाभला आहे, त्याचा यथोचित अभिमान हवाच परंतु त्या वारशाचे जतन करताना आधुनिकता आणि इतिहासाची वर्तमानात स्वतः सांगड न घालता केवळ पूर्वजांच्या इतिहासात रमणाऱ्यांसाठी समर्थ रामदासांनी दासबोधाच्या मूर्खलक्षण दशकात सांगितलेल्या मूर्खांच्या लक्षणांपैकी एक लक्षण असे आहे -
आपली आपण करी स्तुती | स्वदेशीं भोगी विपत्ति |
सांगे वडिलांची कीर्ती | तो येक मूर्ख ||
या ओळी आपल्या पिढीस लागू पडू नयेत यासाठी इथून पुढे जे जे आवश्यक ते ते करण्याची तयारी ठेवायला हवी.
Very well written 😍😍
ReplyDelete