दिवाळी की शिमगा? - 06/04/2020





"असंख्य शंकांनी स्वतःला घेरलेले असताना, या देशातील तुम्ही पाहिलेल्या सर्वात शेवटच्या व्यक्तीचा (गरीब किंवा दुर्बल व्यक्तीचा) चेहरा आठवा, आणि तुम्ही करत असलेल्या कामामुळे त्याचं काही भलं होणार आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारा, आणि जर तसं भलं होणार असेल तरच ते कार्य करा" - स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या संविधान सभेचे सदस्य असलेले बाबू जगजीवन राम यांना महात्मा गांधीजींनी दिलेला हा सल्ला. सदासर्वदा लक्षात ठेवण्यासारखा असलेला हा सल्ला आज आठवण्याचं कारण म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानुसार संपूर्ण देशाने पाळलेला दिवे लावण्याचा उपक्रम.


कोरोनाचे संकट गंभीर आहेच परंतु त्या नंतर येणारे आर्थिक संकट हे त्याहूनही गंभीर असणार यात शंका नाही. या आर्थिक संकटांची जाणीव पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीस नसेल हे केवळ विशिष्ट राजकीय विचारांनी प्रभावित व्यक्तीचं मानू शकते. जगासमोर कोरोनाचे संकट आ वासून उभे असताना, ते कितीही गंभीर असले तरीही न घाबरता एकजुटीने त्याचा सामना करण्याची भावना एका सामाजिक संदेशातून देणे गरजेचे होते. आर्थिक संकटांची जाणीव देशातील आधीच कोरोनाच्या संकटाला भयमनाने सामोरे जाणाऱ्या नागरिकांना देण्यापेक्षा पंतप्रधानांनी देशातील शेवटच्या व्यक्तीस देखील किंचित दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु आज ना उद्या देशासमोरील आर्थिक परिस्थितीची जाणीव सर्व नागरिकांना करून देणे हे केंद्र सरकारचे म्हणूनच पर्यायाने पंतप्रधानांचे कर्तव्य ठरते. ते तसे होते का हे येणारा काळ स्पष्ट करेलच.





या उपक्रमाच्या निमित्ताने उद्भवलेल्या आणखी काही प्रश्नांवर विचार करणे संयुक्तिक ठरेल. त्यातील सर्वात प्रकर्षाने जाणवले ते, थाळी बजावो प्रमाणेच याही वेळी संपूर्ण देशाने संयमितरित्या पाळलेल्या उपक्रमास हाताच्या बोटावर मोजता येतील अशा उच्छादी मंडळींनी लावायचे ते गालबोट लावलेच. कोरोनाच्या संकटात जिथे एकही चूक महागात पडू शकते तिथे अशा एकाही चुकीस थारा नव्हता. तेव्हा जे काही झाले, ज्यांनी कोणी केले ते सर्व अक्षम्यच. परंतु म्हणून हा उपक्रमच कसा घ्यायला नको होता हे सांगणाऱ्यांना, संपूर्ण देशभरात जी भावना तयार झाली आणि हे काही नगण्य उच्छाद यांची तुलना केली तरी या उपक्रमाची उपयोगीता लक्षात येईल.



अगदी स्वाभाविक किंवा आपल्याच राजकीय विचारांनी प्रभावित नागरिकांना या उपक्रमाच्या घोषणेनंतर देशाच्या आर्थिक आणि आरोग्यविषयक परिस्थितीची उत्सुकता निर्माण झाली. या सजग आणि सुशिक्षित नागरिकांनी त्यापूर्वीच्या किंवा त्यानंतरच्या केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या सचिवांची सविस्तर पत्रकार परिषद पाहिली की नाही हा देखील एक प्रश्न आहे. त्यांनी स्वतःच्या हक्कजाणिवेच्या उत्सुकतापूर्तीसाठी ती पाहिली असल्यास, देश अगदी सुरक्षित हातांमध्ये असल्याचा आनंदच. परंतु तसे झाले नसल्यास खरंच ती उत्सुकता होती की केवळ राजकीय विचारांनी प्रभावित मत होते हा प्रश्न मागे उरतोच.


याच्या बरोबरीनेच देशातील बहुसंख्य लोक ज्या वेळी एकजुटीने दिवे लावत दिवाळीसमान उपक्रम करत होते त्याआधी देशातील काही राज्यांच्या उर्जामंत्र्यांची शिमग्यासमान ग्रीड फेल्युअर होण्याची जी काही उरबडवेगिरी चालू होती ती करणे गरजेचे नव्हते. तसे झाले नसते तर संघराज्य म्हणवून घेण्यात आपल्याला आणखी समाधान वाटले असते. असो. दिवाळी असो की शिमगा व्हायचे ते झाले परंतु आता तरी सर्वांनी आपले अभिनिवेष बाजूला ठेवत, न भूतो अशा संकटावर एकत्र येऊन मात करत सीमोल्लंघन करणे गरजेचे आहे, एवढेच काय ते खरे.

Comments

Popular posts from this blog

माणसा मैदानात ये...!

सवाल अच्छे है!

सांगे पूर्वजांची कीर्ती...