माणसा मैदानात ये...!

A Sketch by Canadian Artist Ashkan Golizeh showing statue of liberty goddess, New-York city.



करोना साथीच्या सुरुवातीच्या काळात ज्यावेळी सर्व धर्मांची श्रद्धास्थानं बंद केली गेली त्यावेळी त्यावर प्रतिक्रिया म्हणून अत्यंत अपेक्षित असे दोन सूर आपल्यातून उमटले. त्यातील पहिला वर्ग हा देवांनी कसे जागतिक साथीसमोर हात टेकले हे सिद्ध करण्यात लागला होता आणि दुसरा वर्ग पहिल्या वर्गाचा मुद्दा खोडून काढण्यात लागला होता. गेली चार दशकं धर्माचा आधार घेऊन आपलं राजकारण रेटणाऱ्या एका पक्षाच्या मुखपत्राने यावर 'देवांनी मैदान सोडले' या आशयाचे संपादकीय लिहिले. ते अर्थातच अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच्या त्यांच्या राजकीय शीर्षासनास साजेसे असेच. त्यावर प्रत्युत्तर म्हणून काहींनी वेदातील एका संस्कृत श्लोकाचा आधार घेतला.

न देवा दण्डमादाय रक्षन्ति पशुपालवत्।
यं हि रक्षितुमिच्छन्ति बुद्ध्या संयोजयन्ति।।

याचा अर्थ होतो, 'देव मेंढपाळांप्रमाणे हातात काठ्या घेऊन आपले रक्षण करत नाहीत. स्वतःचे रक्षण करण्यासाठी ते आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये पुरेसे शहाणपण देतात.' खरं तर या निरर्थक चर्चेमध्ये सहभाग घ्यायचे काही कारण नाही, परंतु प्रत्येक वेळी मूळ मुद्द्यांपासून भरकटून जात, आपण नको त्या मुद्द्यांभोवती कसे फिरत राहतो हे स्पष्ट करण्यासाठी हा लेख लिहिणे आवश्यक.

वास्तविकतः अधिकृतपणे या आजाराची उत्पत्ती अपघाती, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ती मानवनिर्मित असेल तर ती चूक माणसांचीच आणि जरी ती अपघाती किंवा नैसर्गिक असली तरी माणसाच्या चुकीच्या आहार सेवनानेच झाली असावी हे तज्ज्ञांचं मतं. म्हणजे यातही चूक माणसांचीचं. या आजारावर एकतर लस शोधून यापासून वाचता येईल किंवा मग सर्दी-तापाप्रमाणे त्याच्याशी जुळवून घ्यावे लागेल. जीवन-मरणाचा प्रश्न असल्याने आणि जगण्याची उमेद हेच अंतिम सत्य असल्याने आपल्याकडून मानव म्हणून जे जे आवश्यक ते ते केले जाईलच परंतु पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण काय काय करायला नको हे जाणून घेणे क्रमप्राप्त ठरेल.

भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरती नुकतीच येऊन गेलेली अम्फन आणि निसर्ग चक्रीवादळे हे देखील मानवाच्याच कृत्यांचे परिणाम. जागतिक तापमानवाढीचा परिणाम म्हणून सागरी पृष्ठभागाचे देखील तापमान वाढते आणि यातून या वादळांची निर्मिती होते. ही वादळे केवळ भारतातच आहेत असं नव्हे, जगभरात ती आढळून येऊ लागली आहेत आणि अशा वादळांची तयार होण्याची वारंवारिता (frequency) देखील वाढत आहे. हे सर्वश्रतु सत्य आज पुन्हा मांडण्याचे औचित्य साधण्याचे कारण म्हणजे, करोना काळात आपल्या अमर्याद आणि बेमुर्वत वापरामुळे आपण निसर्गाचं कसं नुकसान करतो हे समोर दिसत असताना देखील जगातील सर्वच देशांची करोनोत्तर आर्थिक धोरणं ही अधिकाधिक उद्योगधार्जिणी होत आहेत. ती तशी उद्योगसुलभ होऊ नयेत असं म्हणणं चुकीचं, परंतु हे सगळं करताना ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशातील जंगलांचा जाणीवपूर्वक केलेला ऱ्हास इतर देश अनुसरणार नाहीत याची काडीमात्र शाश्वती नाही.

या सगळ्या स्पर्धेतून शेवटी आपण आपल्याच विनाशाकडे अधिक ढकलले जाऊ हे वास्तव सर्वांनाच समोर दिसतंय. जर्मनी सारख्या देशाने पुढील 40 वर्षांत आपली कर्बाधारीत ऊर्जानिर्मिती संपूर्ण समेटण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. भारताने देखील सौरऊर्जा निर्मितीमध्ये स्वतःसाठी काहीएक उद्दिष्ट निश्चिती करून त्या दिशेने योग्य वाटचाल ठेवली आहे, त्यात आणखी वृद्धी आवश्यक. जागतिक तापमानवाढ हे काही शास्त्रज्ञांनी स्वतःच्या फायद्यासाठी उभे केलेले थोतांड आहे हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मत, हेचं आणि आणखी काही कारणे पुढं करत अगदी अलीकडेच जी-7 संघटना मोडीत काढत त्यांनी नवीन जी-5 संघटनेच्या स्थापनेसाठी भारताला निमंत्रण दिले. यावर आपण काय भूमिका घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

या सगळ्यातून एकच सिद्ध होतं, ते म्हणजे जे काही करतोय ते मानवच, इथून पुढे देखील जे काही करायचं ते देखील मानवच करणार, उगाच देवांच्या आड किंवा अधिक व्यापक अर्थाने घ्यायचे झाल्यास मुख्य मुद्द्यांना सोडून नको त्या मुद्द्यांपाठीमागे लपण्यात काही अर्थ नाही. नास्तिकांच्या मते देवाचं अस्तित्त्वच नाही तेव्हा मैदान सोडण्याचा प्रश्नच नाही आणि आस्तिकांचे मूर्तीरूपी देव त्यांनीच मंदिरात बंद केलेले. तरी सुद्धा मैदान सोडलंय ते माणसातल्या माणूस नावाच्याच देवांनी, विज्ञाननिष्ठ संकट समोर दिसत असताना माणसातल्या विवेकाने. तेही हे संकट उद्भवण्याच्या खूप पूर्वी. माणूस माणुसकीच्या मैदानात जेव्हा परतेल, तेव्हा निसर्ग नावाचा देवही मैदानात येईल. नाहीतर मैदान देवांनी सोडलंय आणि आम्ही कसे लढतो आहोत या अहंकाराचा शेवट हा आपल्याच शेवटाने होईल हे वेगळं सांगायला नको. जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना कार्यप्रेरक शुभेच्छा.

Comments

  1. खूप छान शब्दात माणसाला फटकारे मारले सर..
    नक्कीच माणसाला विचार करायला लावणारा लेख.. खूप छान

    ReplyDelete
  2. Excellent and to the point writeup.����

    ReplyDelete
  3. मस्त च प्रसाद कमी लिखाणात जास्त शाब्दिक मारा 👌

    ReplyDelete
  4. सर्वश्रतु हा चुकीचा शब्द आहे त्या ठिकाणी सर्वश्रुत हा शब्द हवा.

    ReplyDelete
  5. माणसाला त्याच्या कर्माची फळ त्यालाच चाखावी लागणार याची कमी शब्दात चांगलीच जाणीव करून दिलीत तुम्ही. जगात जे तांडव चाललं आहे याचा कर्ता माणूस स्वतः आहे हे दाखवून देणं गरजेचंच होत.

    ReplyDelete
  6. खूप खोचक आणि सुरेख मांडणी....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सवाल अच्छे है!

सांगे पूर्वजांची कीर्ती...