पडिले वळण इंद्रिया सकळा...
एकच अनुभव जेव्हा
मेंदूला वारंवार येऊ लागतो तेव्हा मेंदू त्या अनुभवाची आणि त्याला दिलेल्या
प्रतिसादाची तीव्रता कमी करतो. वैज्ञानिक संज्ञेत याला ‘हॅबिच्युएशन’ (Habituation) म्हणजेच सवय होणे म्हणतात. वैयक्तिक, सामाजिक आणि
सामाजिकतेच्याच चौकटीत येणाऱ्या प्रशासकीय सवयी हा बऱ्याच वेळा चर्चेचा विषय असतो, यापूर्वीही
यावर केवळ चर्चाच खूप झाली आहे. कोणत्याही चर्चेसाठी औचित्य गरजेचं आणि हे औचित्य
सद्यस्थितीने साधलंय. म्हणून पुनःश्च यावर विचार करून अधिक कृती करण्याची आवश्यकता
आहे.
'सवाल अच्छे है!' या मागील लेखात संभाव्य सामाजिक संथपणा किंवा सुस्तपणा यावर भाष्य झालंच
आहे. येत्या काळात ही संभाव्य सवय आपण व्यक्ती आणि समाज म्हणून अंगीकृत न करता
त्यापासून किती अंतर ठेवतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. असो, ते
येणाऱ्या काळात समजेलच. कोविड विषाणूच्या निमित्ताने एक गोष्ट चांगली झाली म्हणता
येईल. शहरापासून गावापर्यंत सर्वांच्याच मनात आरोग्यविषयक समज वाढायला मदत झाली.
या समजाची आणि आरोग्याबरोबरच स्वच्छतेचीही आता सर्वांना सवय व्हावी हीच अपेक्षा.
मध्यम वर्ग आणि
साधनसंपन्न उच्च वर्गातील नागरिकांना वैयक्तिक स्वच्छता जेवढी प्रिय असते त्याहून
अधिक त्यांना सार्वजनिक आणि त्यातही खास करून पर्यटन स्थळांवरील स्वच्छतेचे भान
नसते. हे अंगवळण सोडून देणे गरजेचे. अशा चर्चाना सुरुवात झाली की वरोल्लेखित वर्ग
आपल्या सवयीप्रमाणे सध्याच्या मुंबई मधील धारावी सारख्या झोपडपट्ट्यांकडे बोटं
दाखवायला सुरुवात करतो. शहरी किंवा ग्रामीण भागातील झोपडपट्टी भागातील अस्वच्छतेला
परिस्थिती आणि प्रशासकीय अपयश जबाबदार असताना, पूर्वग्रहदूषित
बहुतांश लोकसंख्येने त्यांना दोषी धरणे चुकीचे. संसाधने सहजतेने उपलब्ध होतात
तिथेच उद्योग आणि त्याला चालवणारे हात स्थिरावतात, हे उघड सत्य. पण आता
अशी संसाधनेच सुरुवातीच्या खर्चाने विकेंद्रित करून संभाव्य शहरी दाट लोकसंख्या
कमी करता येईल का, की जेणेकरून नंतरच्या काळात या दाट लोकसंख्येच्या व्यवस्थापनावर
जास्त खर्च न करता, त्यांनाही सुखद आणि सन्मानजनक आयुष्य जगता यावं, यावर
विचार होऊन जलदकृती होणे गरजेचं.
प्रशासकीय निर्ढावलेपण
ही आपल्याकडील आणखी एक समस्या. सुटलेली पोटं, आंधळा-गोंधळा कारभार
आणि संथ कार्यगती, काही अपवाद वगळता, ह्या लोकांना जनमानसात आपली एवढीच ओळख निर्माण करण्यापलीकडे काही करता आले
आहे असे वाटत नाही. परिणामस्वरूप कोविडने
आपल्या आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा दाखवून दिल्या. शीतयुद्धापासूनच्या काळात सतत
अस्थिरतेचे झोके घेणारा क्युबा सारखा देश आरोग्यक्षेत्रात आपल्याहून चांगली
कामगिरी करतो ही बाब निश्चितच आपणास भूषणावह नाही. तेव्हा आता तरी सरकारने आणि
त्याला हाकणाऱ्या प्रशासनाने, ज्यांनी आजवर शिक्षण, आरोग्य
आणि पर्यटन यांचा आपल्या सवयीप्रमाणे प्राधान्यक्रम पायदळीच तुडवला आहे, आता
तरी अधिक अग्रक्रमाने या तीन क्षेत्रांमध्ये ठोस बदल घडवून आणणे गरजेचं आहे.
या सर्वांच्या मुळाशी असणाऱ्या एका सवयीचा उल्लेख करणे गरजेचं
आहे. एकदा निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना पुढच्या मतदानापूर्वीपर्यंत प्रश्न न
विचारणे ही देखील आपल्या नागरिकांची महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत सहन
करण्याची सवय. आजकाल समाजमाध्यमांचा आधार घेत असे प्रश्न विचारणे चालू झाले असले
तरी असे केवळ पावसाळ्यात उगवणाऱ्या भूछत्राप्रमाणे असतात. त्यातही समाजमाध्यमांवर
चारचौघात स्वतःस मिरवता येईल अशा लोकप्रतिनिधींनी काहीही आणि कितीही अभद्र केलं
तरी त्याचं मोफत वकीलपत्र घेणाऱ्या भांडखोरांचीच संख्या वाढत असताना, लोकप्रतिनिधींना, त्यातही
खास करून स्थानिक लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणार कोण? हाच मुळी प्रश्न होऊन बसला आहे. तेव्हा नागरिक म्हणून हक्काच्या
मूलभूत सोयीसुविधांसाठी प्रश्न विचारणे याची देखील आपणांस सवय लावून घेणे आवश्यक
आहे.
तुकाराम महाराजांनी
लिहिलेल्या-
पडिले वळण इंद्रिया सकळा ।
भाव तो निराळा नाही दुजा ।।
या ओळी, आपल्या आजच्या सवयींनाही लागू होतात. पण तुकोबांच्या वरील उक्तीविपरित जाऊन, 'भाव तो निराळा हवा आता' म्हणत काही वैयक्तिक आणि सामाजिक अंगवळणे सोडून देत काहींना अंगीकृत करण्याची ही योग्य वेळ ठरू शकते.

✌👍
ReplyDelete♥️
ReplyDelete👍
ReplyDeleteNice one.
ReplyDelete,👌👌 मार्मिक
ReplyDelete🙏👌
ReplyDelete👌👌
ReplyDelete👍👍
ReplyDeleteNice Prasad, you should try to write on your project and programs. Best luck
ReplyDeleteSure. Thanks for the suggestion.
Delete